नाशिक : नाशिक शहरात गेल्या पंधरा दिवसापासून भर रस्त्यात प्राणघातक हल्ले, सराईत टोळक्यांकडून सर्रासपणे प्राणघातक शस्त्र घेऊन मिरवणे, खून, शाळकरी मुलांवर कोयत्याने हल्ले त्यामुळे नाशिक बिहार झाले का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. गुन्हेगारी रोखण्यात नाशिक पोलीस अपयशी ठरत असून नागरिकांचा रोष वाढला आहे.
भुजबळांची कायदा सुव्यवस्थेबाबत नाराजी : शहरात रोज होणाऱ्या हाणामाऱ्या,खुनाचा प्रयत्न,खून यासारख्या गंभीर गुन्ह्यासह चेन स्नाचिंग, घरफोड्या, वाहन चोरी या घटनाही सुरू आहे. तसेच अनेक गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश दिसून येते आहे. त्यात गुन्ह्याचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत असे, सांगून छगन भुजबळ यांनी कायदा सुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हेगारीबाबत पोलीस नक्की काय करतात ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी वेळीच लक्ष न दिल्यास जनतेचा उद्रेक रस्त्यावर दिसेल अशा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.
आम्ही उठाव करू : नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी नाशिकमधील गुन्हेगारांना आवरावे, अन्यथा नाशिककरांच्या वतीने आम्ही उठाव करू असा दम भुजबळ यांनी नाशिक पोलिसांना दिला आहे. तसेच भुजबळ यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे वाढत्या गुन्हेगारी बाबत संतापही व्यक्त केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्च्या हलवल्या : वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कठोर भूमिका घेत सात पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह दुय्यम निरीक्षकांच्या खुर्च्या हलवण्याचे आदेश दिले आहेत. यात पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांची सायबर पोलीस ठाण्यात, नाशिक रोडचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांची पंचवटी पोलीस ठाण्यात, सायबरचे निरीक्षक सुरज बिजली यांची अंबडला तर, अंबडचे नवनियुक्त निरीक्षक युवराज पतकी यांची मुंबई नाका पोलीस ठाण्यात, इंदिरानगरचे संजय बांबळे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. तसेच गणेश न्याहदे यांच्याकडे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांना तातडीने रुजू होण्याची आदेश : नाशिक रोड पोलीस ठाण्यात इंदिरानगरचे दुय्यम निरीक्षक देविदास वांजळे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सातपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी उपनगरचे दुय्यम निरीक्षक पंकज भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील दुय्यम निरीक्षक अशोक शरमाळे यांच्यासह नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अपेक्षा जाधव यांच्याकडे चुंचाळे शिवारातील पोलीस चौकीचा कारभार सोपवण्यात आला आहे. या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने रुजू होण्याची आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.