नाशिक - दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी आणखी दोन संशयितांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. सोमवारी आलेल्या रिपोर्टमध्ये मालेगाव येथे बंदोबस्तावर असलेल्या दिंडोरी शहरातील रहिवाशाचा आणि मोहाडी येथील एका भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्याचा समावेश आहे.
दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात सर्वेक्षण वैद्यकीय तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबईहून आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह येताच प्रशासनाने त्याच्या संपर्कातील 17 संशयितांचे नमुने शनिवारी तपासणीस पाठवले होते. त्यातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर पंधरा रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
सोमवारी मोहाडी व दिंडोरी शहरात प्रत्येकी एक अशा दोन नवीन रुग्णांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मोहाडी येथील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी नाशिक बाजार समितीत जात होता. तर दिंडोरी शहरात वास्तव्यास असलेले नियुक्त पोलीस कर्मचारी मालेगाव येथे बंदोबस्तास होते. दरम्यान, ते अनेक दिवस मालेगाव येथेच बंदोबस्तात असून घरी आले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासन याबाबत अधिक माहिती घेत असून दोन्ही रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची शोधाशोध सुरू झाली आहे
प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुजित कोशिरे ,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ विलास पाटील यांच्यासह वैद्यकीय पथकाने रुग्ण आढळलेल्या ठिकाणी भेट देत उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्णांच्या राहत्या घरापासून 1 किलोमीटरचा परिसर कंटेनमेंट झोन व 2 किमी परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळत अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दिंडोरी शहराजवळच असलेल्या निळवंडीतदेखील कोरोना रुग्ण आढळल्याने दिंडोरीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांनी कडक लॉकडाऊन पाळण्याचे ठरवले आहे. सोबतच किराणा व्यापारी ,हार्डवेअर व्यापारी असोशियशनने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजीपाला, फळे यांचे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. मद्य विक्रीची दुकानेही सोमवारीच बंद करण्यात आली असून सर्वानुमते कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये, असे आवाहन दिंडोरी नगरपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले आहे