नाशिक : जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी टोमॅटो पिकाचे मोठे उत्पादन झाले होते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल झाल्याने, शेतकऱ्यांना कवडी मोल भावात टोमॅटो विकावे लागले होते. मात्र आता आसमानी फटक्याने टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचा भाव तेजीत असून सर्वसामान्य नागरिकांना जादा दरात टोमॅटो खरेदी करावा लागत आहे.
ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार : नाशिक जिल्ह्यात महिनाभरापूर्वी टोमॅटोचे बंपर उत्पादन झाल्याने किरकोळ बाजारात किलोला 4 ते 5 रुपये पर्यंत मिळालेला दर आता तब्बल 70 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. भाव पडल्यामुळे गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी उभे पिक तोडून टाकले होते. तर काही शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये जाण्याचा वाहतूक खर्च परवडत नाही म्हणून, अक्षरशः टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातच मेमध्ये अवकाळी पाऊस व प्रचंड उष्णतेने उर्वरित पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे टोमॅटो बरोबरच इतरही भाजीपाल्यांचे दर आणखीन काही दिवस वाढतेच राहणार असल्याने, ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
विक्रेते ग्राहकांना सोसावे लागते नुकसान : टोमॅटोचे दर अचानक वाढल्याने ग्राहकांसह रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना त्याचे नुकसान सोसावे लागत आहे. मार्केटमध्ये टोमॅटोच्या वीस किलोच्या जाळीला 700 रुपये पर्यंत पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे काय भावाने विक्री करायची असा प्रश्न त्यांना पडला आहे. टोमॅटोचे भाव हे स्थिर व्हायला हवे जेणेकरून याचा फायदा शेतकरी, किरकोळ विक्रेते तसेच ग्राहकाला देखील होईल असे विक्रेत्यानी सांगितले.
पुढील काही दिवसात भाव वाढतील : एप्रिल अखेरीस टोमॅटोचे दर कोसळले त्यामुळे टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या पेठ, दिंडोरी निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उभे पिक तोडून टाकले होते, त्यातच जे उरले होते त्यांनाही अवकाळी पाऊस व वाढत्या उष्णतेचा फटका बसल्याने उत्पादन घटले आहे. पंचवटीतील नाशिक बाजार समितीत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून टोमॅटोची आवक कमी झाल्याने भावाने उसळी घेतली आहे. 20 किलोला किलोच्या जाळीला सातशे रुपये पर्यंत भाव गेले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो प्रति किलो 70 ते 80 रुपयापर्यंत खरेदी करावे लागत आहे. इतर भाजीपाल्यांचे दरही दुपटीने वाढले आहेत. गवार, मिरची, वाल, दोडके फ्लावर शेवग्याचे भावही वाढले असून ते पुढील पंधरा दिवस टिकून राहतील असा अंदाज बाजारीच समितीने व्यक्त केला आहे.
सरकारने नियोजन करावे : शेतीमालाचा दर वाढल्याच्या सर्वाधिक फटका ग्राहकांना बसतो. आवक वाढल्यावर व्यापारी कमी भावाने खरेदी करतात मात्र शेतकऱ्याला भाव मिळत नाही. तसेच दर कमी होत नसल्याने ग्राहकांनाही त्याचा फायदा होत नाही. सरकारने ज्यावेळेस भाव कमी असतात त्यावेळेस स्टोरेजची व्यवस्था करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच ग्राहकांना देखील योग्य दरात शेतीमाल मिळू शकेल असे ग्राहकांनी सांगितले. तर वाढलेल्या भाजीपाल्यांचे दर हे असे आहेत, टोमॅटो 70 ते 80 रुपये किलो, मिरची 90 रुपये किलो, आले 170 ते 180 रुपये किलो, कोथिंबीर 50 ते 60 रुपये जुडी, मेथी 25 रुपये जुडी, फ्लावर 80 ते 90 रुपये कंद.
हेही वाचा -