नाशिक - जिल्ह्यात बुधवारी 390 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. वाढलेल्या रुग्णसंख्येपैकी 307 रुग्ण नाशिक शहरातील आहेत, तर दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत 10 हजार 454 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील 420 जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 7370 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सद्यस्थितीत वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये 2664 जण उपचार घेत आहेत.
अँटिजेन टेस्टमुळे बाधितांचा आकडा वाढणार -
नाशिकमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने मिशन झिरो नाशिक उपक्रमाअंतर्गत शहरात विविध ठिकाणी 1 हजार कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत.
नाशिक शहरातील जुने नाशिक, पंचवटी, वडाळा, नाशिक रोड हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. आरोग्य विभागाने या भागाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. बुधवारी जुने नाशिक, फुले नगर, माल धक्का नाशिकरोड, टाकळी गाव, कामटवाडे, अंबड गाव, बिडी कामगार, हमालवाडी, आरटीओ भागात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पहिल्या दिवशी 1066 जणांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यात 66 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
मृतांची संख्या
नाशिक ग्रामीण 98
नाशिक मनपा 221
मालेगाव मनपा 83
जिल्हा बाह्य 18
एकूण नाशिक जिल्ह्यात 420
नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती
-एकूण कोरोनाबाधित रुग्ण 10454
-कोरोनामुक्त - 7370
-एकूण मृत्यू -420
-एकूण उपचार घेत असलेले रुग्ण-2664