नाशिक- शहरातून १९ मोटारसायकली चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात नांदगाव शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने चोरट्यास अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेल्या १९ पैकी १४ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर माहिती मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समरसिंग साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
प्रवीण रतन सोनवणे (२४) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नांदगाव शहरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यात शहरातून जवळपास १९ मोटारसायकली चोरीला गेल्या होत्या. सदर मोटारसायकली ठराविक दिवशी व ठिकाणाहून चोरीस जात असल्याचे पोलीस निष्कर्षात दिसून आले. याच दृष्टिकोनातून नांदगांव पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीसांनी आठवडे बाजाराच्या दिवशी गुरुवारी सकाळ पासूनच मच्छीबाजार, खुशबू हॉटेल व पांचाळ गल्ली आदी ठिकाणी सापळा रचला होता. पोलिसांनी आपली ओळख पटू नये यासाठी त्यांनी साधे गणवेश परिधान केले होते. उपरोक्त ठिकाणी सायंकाळी सहा वाजता पोलिसांना चार, पाच मोटार सायकलींना चाव्या लावण्याच्या प्रयत्न करतांना एक संशयास्पद व्यक्ती आढळून आला. या ठिकाणाहून पळून जात असतानाच प्रवीण रतन सोनवणे (वय.२४ रा. राजमाने तालुका मालेगांव, मु. मेहूणबारे ता चाळीसगाव) यास पोलिसांनी अटक केली.
सुरवातीला नाही म्हणणाऱ्या प्रवीणला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून १४ मोटारसायकली देखील हस्तगत करण्यात आल्या. त्यास पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्यावर भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले. चोरट्याकडून पुन्हा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तपासात पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोलीस हवालदार श्रावण बोगीर, राकेश चौधरी, अनिल शेरेकर, भारत कांदळकर यांच्यासह पोलीस सहभागी होते. न्यायालयात हजर केले असता प्रवीणला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा- खासदार भारती पवार यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची कानउघडणी