नाशिक : अनेकदा अती पर्जन्याच्या परिसरात पावसाळ्यात रस्ते खचून वाहतुकी विस्कळीत होण्याचे प्रकार घडत असतात. मात्र यावर पर्याय म्हणून पावसाळ्यात रस्ते वाहून जाऊ, नये यासाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 'सॉईल स्टॅबिलायझेशन' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सॉईल स्टॅबिलायझेशन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील पहिला रस्ता इगतपुरी तालुक्यात साकारतो आहे. पिंपळगाव मोर ते वासाळी या दोन गावांमधील 13.8 किलोमीटर अंतराचा रस्ता तयार करण्यात येत आहे. आशियाई डेव्हलपमेंट बँकेच्या आर्थिक सहकार्याने 98 कोटींचा रस्ता तयार होत आहे. या रस्त्याच्या कामाचा कालावधी दोन वर्षांचा असताना सहा महिन्यांत रस्त्याचे 50 टक्के काम पूर्ण झाले. तर पुढील सहा ते सात महिन्यांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्याची शक्यता आहे.
एशियन डेव्हलपमेंट बॅंकेचे अर्थसहाय्य : नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. यामुळे या भागातील रस्त्यांचा भराव वाहून जाणे, रस्त्याला खड्डे पडणे अशा समस्या निर्माण होत असतात. त्यावर उपाय म्हणून बांधकाम विभागाने 'सॉईल स्टॅबिलायझेशन' तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने 98.8 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. सॉईल स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञानामध्ये रस्त्यासाठी भराव उभारताना तो केवळ मुरूम, माती, दगडाचा वापर न करता त्यात काही प्रमाणात सिमेंट मिसळतात. यामुळे भराव भक्कम होऊन पावसाळ्यामध्ये पाण्याचा लोंढा आला तरी, पाणी रस्त्यावरून वाहून जाते. त्याचप्रमाणे सात मीटर रुंदीच्या या रस्त्याचे पूर्ण काँक्रिटीकरण केले जात आहे.
राज्यातील पहिला : या नवीन रस्त्यावर कडवा नदी तसेच शुक्लतीर्थ या ठिकाणी दोन पूल उभारले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये त्याची सुरुवात झाली असून आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे. राज्यातील हा पहिला रस्ता असून त्याच्या यशस्वी चाचणीनंतर माती स्थिरीकरण तंत्रज्ञानाचा वापर बहुतांश रस्त्यांवर केला जाणार आहे.
सॉईल स्टॅबिलायझेशन म्हणजे काय : पावसाळ्यात पाण्यामुळे रस्ते वाहून जाण्याचे प्रकार घडतात. पावसाळ्यात या रस्त्यांची दुरुस्ती करता येत नसल्यामुळे त्या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद होते. तसेच त्या भागाचा संपर्क देखील तुटतो. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणेही अवघड होते. यामुळे राज्य सरकारच्या आशियाई बँकेच्या सहाय्य्याने पावसाळ्यात रस्ते वाहून जाणार नाहीत,असे रस्ते उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील या पहिल्या रस्त्यासाठी सॉईल स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यात रस्ते प्रामुख्याने सिमेंट कॉक्रिटचे बांधले जातात. या रस्त्यांसाठी केवळ माती-मुरूम टाकून भराव उभारण्याऐवजी त्यात काही प्रमाणात सिमेंट मिसळले जाते.
वेळेत काम पूर्ण होणार : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या अतिपावसाच्या भागात सॉईल स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील पहिला उभारला जात आहे. हा रस्त्याचे काम मुदतीपूर्वी वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे यांनी सांगितले.