नाशिक - शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या चार दिवसांपासून तापमाचा पारा 10.६ अंशांवर आलाय. नाशिककर सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. मात्र दुसरीकडे बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
राज्यातील कोरड्या हवामानामुळे थंडीमध्ये वाढ होत असून नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून सकाळी आणि रात्री थंडीचा तडाखा जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी 10.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारीही 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाडमध्ये 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून सर्वच धरणात मुबलक पाणी साठा आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राची संस्कृती एमटीडीसी-नाशिक बोट क्लबच्या लोगोवर, पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते अनावरण
द्राक्ष पिकांसोबत इतर पिके अडचणीत
नाशिक जिल्हा कांद्याबरोबरच सर्वधिक द्राक्ष उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशात सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. भारतासह अनेक देशात येथील द्राक्ष निर्यात होत असतात. गेल्या चार दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत चालल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावला आहे. जास्त थंडीमुळे निर्यातक्षम द्राक्षाची पत मिळणे अवघड होते तसेच अति थंडीमुळे औषध फवारणीचा खर्च देखील दुप्पट होतो. यासोबतच धुके आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, मका आणि भाजीपाला या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - रायगड येथील रोहा एमआयडीसीमधील सुदर्शन कंपनीला भीषण आग