नाशिक - जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देत त्यांना दिलासा मिळवून द्यावा, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ग्रामीण पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
व्यापाऱ्यांवर कडक कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आदेश -
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, निफाड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत परिस्थिती समजून घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक -
जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पाडवा अॅग्रो सोल्युशन या एक्सपोर्टर कंपनीकडून अडीच कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक करण्यात आलेली आहे. याबाबत विविध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे. मात्र अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसून शेतकरी वर्गाला दिलासा देण्यात यावा, असे म्हटले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जो नवीन कायदा करण्यात येत आहे. त्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे एक्सपोर्टर असतील किंवा स्थानिक व्यापारी यांनी फसवणूक केल्यास त्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी. तसेच व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांचे पैसे लवकर मिळावे यासाठी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केलेली आहे.
सात जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली अटक -
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना पाडवा ऍग्रो सोल्युशन फर्म या कंपनीने तब्बल अडीच रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, चांदवड या तालुक्यांमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या कंपनीने शेतकऱ्यांकडून एक्सपोर्ट द्राक्ष खरेदी केली, मात्र त्यांना पैसे दिलेच नाही. जे चेक दिले गेले, त्या अकाउंटवर पैसे नसल्याचे समोर आले आहे. अडीच ते तीन महिने उलटूनही शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. जवळजवळ 50 ते 60 शेतकऱ्यांची यात फसवणूक झाल्याची माहिती आहे. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील 7 जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पाच जण मिळून ही कंपनी सुरू केली होती. मात्र शेतकऱ्यांना उडवा-उडवीची उत्तर देत, त्यांची फसवणूक केली आहे. तसेच जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत. तोपर्यंत अटक केलेल्यांना जामीन मिळू नये, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.