नाशिक- मालेगावमध्ये कोरोनाची परिस्थिती अद्याप हाताबाहेर गेलेली नाही. त्यामुळे, कोरोनाचा अटकाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत प्रशासनाकडून यंत्रणेला दिली जात आहे. या ठिकाणी शंभर डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून काही डॉक्टर अजूनही सेवेत रुजू झाले नाहीत. पोस्टिंग नाकारणारे डॉक्टर पुढील २४ तासात रुजू न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना निलंबित करावे, असे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे हे मालेगावमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, मिशन मालेगाव फत्ते करणार, असा विश्वासही मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. मालेगावमध्ये अतिशय घनदाट लोकवस्ती असून त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढला आहे. मालेगावमध्ये ज्या १२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता त्यांनी उपचार घेण्यास टाळाटाळ केली होती, त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. मोठया प्रमाणात अज्ञानामुळे मालेगावात करोनाचा संसर्ग वाढला आहे. करोना व्यतिरिक्त येथील नागरिक इतर आजाराने देखील ग्रस्त आहेत. अशा रुग्णांची संख्या मोठी आहे. इतर डॉक्टरांनी ओपीडी सुरू न केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
तसेच, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या पथकांना पीपीई किट दिली जाईल. मालेगावात काम करणाऱ्या टिमला पोर्टेबल किट दिली जाईल. मालेगावात करोना संशयितांचे गृह विलगीकरण करणे शक्य नाही. त्यांचे आयसोलेशन विलगीकरण केले जाईल. मालेगावमध्ये करोनाला अटकाव घालण्यासाठी उत्कृष्ट डॉक्टरांच्या पथकाची मदत घेतली जाईल. धर्मगुरुंची मदत घेऊन जनजागृती केली जाईल. नॉन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी २०० खाटांचे रुग्णालय राखीव ठेवण्यात आल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा- नाशिक पोलिसांनी गाणे वाजवून वधू-वरास दिल्या लग्नाच्या शुभेच्छा