मालेगाव (नाशिक) - कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी मालेगाव शहर परिसरात सोमवानंतरही (ता. 19) पुढील आदेशापर्यंत संचारबंदी कायम करण्यात आली आहे. तसे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी निर्गमित केले आहेत. अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याने नागरिकांनी घरात थांबून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोनाच्या प्रसारात देशात व राज्यात झपाट्याने वाढ होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेवून मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होवू शकते. मालेगाव शहरात आतापर्यंत 619 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांपासून मालेगाव शहरातील इतर नागरिकांच्या जीवितास कोविड-19 चा प्रादुर्भाव व प्रसार होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालेगाव शहरात पूर्णत: संचारबंदी करणे अनिवार्य आहे. तसेच, अपर पोलीस अधीक्षकांनी सादर केलेला अहवाल पूर्णत: संचारबंदी लागू करण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे.
या पार्श्वभूमीवर दंडाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी त्यांच्या अधिकारांनुसार संपूर्ण मालेगाव शहराच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम 144 (1) (3) अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. यात अत्यावश्यक आरोग्य सेवा व कायदा सुव्यवस्थासाठीचे मनुष्यबळ अपवाद असतील, असेही दंडाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.
मालेगाव महानगरपालिका आयुक्तांनी कन्टेमेंट परिक्षेत्र म्हणून प्रतिबंधित केलेले भाग वगळता उर्वरित भागांसाठी या आदेशातून खालील आस्थापना, दुकाने यांना वगळण्यात येत असल्याचेही कळवले आहे.
- यात प्रामुख्याने मेडिकल्स, रुग्णालये, दूध व दुग्धोपादने पुरवठा करणारे विक्रेते, गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीज, चारा पुरवठा करणारे विक्रेते, किराणा दुकाने यांना सकाळी 07:00 ते दुपारी 2:00 व सायंकाळी 5.00 ते 08.00 वाजेपावेतो सूट राहील.
- केवळ हातगाडीवरून फळांची विक्री करणारे विक्रेते सकाळी 07.00 ते 02.00 या वेळेत फळांची विक्री करु शकतात.
- पोलीस विभाग, महसूल विभाग, महानगरपालिका, आरोग्य विभागासह इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच खासगी डॉक्टर व त्यांच्या आस्थापनेवरील स्टाफ यांना पेट्रोल, डिझेल पुरवठा करण्यासाठी निर्धारित केलेले पेट्रोलपंप सकाळी 07:00 ते दुपारी 02:00 वाजेपावेतो सुरू राहतील.
यामध्ये पोलिस दक्षता पेट्रोलपंप (रावळगांव नाका, मालेगाव कॅम्प); मुतल्लिक पेट्रोलपंप (दरेगांव); बालाजी पेट्रोलपंप (सोयगाव); उदयराज ऑटोमोबाईल, पेट्रोलपंप (मालेगाव कॅम्प); नॅशनल पेट्रोलपंप (दरेगाव रोड, मालेगाव); एम. जी. पेट्रोलपंप, नवीन तहसिलच्या पाठीमागे (मालेगाव); ए. आर. पेट्रोलपंप (स्टार हॉटेल शेजारी, मालेगाव) या सात पेट्रोलपंपांचा समावेश आहे.
- शहरी हद्दीपासून 2 किलोमीटर परिघातील इतर सर्व पेट्रोलपंप बंद राहतील.
- मालेगाव शहरातील प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेन्मेंट एरिया) वगळता इतर भागातील सर्व बँकांना सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत संचारबंदीच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.
- कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी संबंधितांना (महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, मालेगाव महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी) यातून वगळण्यात आले आहे. मात्र, त्यांनी स्वत:चे ओळखपत्र सोबत बाळगणे व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.