नाशिक : राज्यात आजपासून बहुतेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहे. शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेकडून ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. मात्र नाशिकच्या एका शाळेत विद्यार्थी चक्क घोड्यावरून वाजत-गाजत शाळेत प्रवेश करत आले. विद्यार्थ्यांना घोड्याची रपेट मिळाल्याने त्यांच्या आनंद द्विगुणित झाला होता.
शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत : शाळेचा पहिला दिवस नेहमीच स्मरणात राहणारा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी शाळा देखील प्रयत्न करत असते. असेच नाशिकच्या रचना स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे आगळ्या वेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना घोड्यावर बसून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत एक रपेट मारण्यात आली. तसेच प्रवेशद्वारावर औक्षण करत बँड पथकाच्या तालावर पुष्पवृष्टीचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
स्वागतामुळे विद्यार्थ्यांसह पालक आश्चर्यचकीत : यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात फुग्यांची आणि फुलांची सजावट असलेली कमान उभारण्यात आली होती. तसेच नाशिक शहरातील अनेक शाळांमध्ये अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी शाळेत स्वागत करण्यात आले आहे. शाळा प्रशासन आणि शिक्षकांच्या या अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांसह पालकही भराववून गेले होते.
हा दिवस स्मरणात रहावा : विद्यार्थी शाळेत पहिल्या दिवशी येतांना त्यांच्यासाठी हा दिवस स्मरणात रहावा यासाठी आमच्या संस्थेने विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणूक काढत त्यांना शाळेत आणले. यावेळी विद्यार्थ्यांचे ढोल पथक यात सहभागी झाले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देत त्यांना पेढे भरवले. यावेळी शाळेमध्ये सजावट करण्यात आली होती. ज्या पद्धतीने मुले शाळा कधी सुरू होईल याची वाट बघत होते. त्याच पद्धतीने आम्ही शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी अतुर होतो. हा दिवस आमच्यासाठी देखील स्मरणात राहणार आहे अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्यध्यापिकेने दिली आहे.
हा दिवस कधीच विसरणार नाही : मी पहिलीतून दुसरीत गेली आहे. शाळा कधी सुरू होईल याची मी वाट बघत होते. आज शाळेचा पहिला दिवस असल्याने मला माझ्या मित्र, मैत्रिणी भेटणार असल्याने मला अधिक आनंद होता. अशात शाळेत गेल्यावरती शिक्षकांनी मला घोड्यावर बसवून माझी वाजत गाजत मिरवणूक काढली. मला खूप मजा आली, हा दिवस मी कधीच विसरणार नाही, असे एका विद्यार्थ्यांनीने सांगितले.
हेही वाचा - School Open IN Mumbai : मुंबईमधील शाळा सुरू, अंधेरीत शाळेत मुलांचं पुस्तक देऊन स्वागत