नाशिक - जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजार रुपये दंड केला जाणार आहे. ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच शनिवार व रविवारी पूर्णत: लाॅकडाऊन हा नाशिक पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अत्यावश्यक सेवा सोडून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत सगळे बंद -
मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रीमंडळाशी रविवारी संवाद साधला. पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यात सहभाग नोंदवला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनच्या चर्चेला विराम लावत ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाने जारी केलेल्या नव्या निर्बंधाची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. माॅल, सिनेमा गृह, वाॅटर स्पोर्ट, बार व रेस्टॉरंट, सिनेमा गृहे, राजकिय व सामाजिक सोहळे सर्व बंद राहतील. अत्यावश्यक सेवा सोडून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत सगळे बंद राहील, असे पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड -
सार्वजनिक वाहतुकीमध्ये देखील काही बदल केले जाणार आहेत. मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल. बँका वगळता इतर ठिकाणी वर्क फ्रॉम होमवर जास्त भर देण्यात येईल. सरकारी कार्यालयात देखील ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम केले जाईल. बार व रेस्टॉरंटवर निर्बंध असले तरी पार्सल सेवा सुरू राहील. शाळा-कॉलेज ऑनलाईन पद्धतीने सुरू राहतील. मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करून सोसायटीला बोर्ड लावण्यात येतील. बांधकाम व्यवसायिकांनी कामगारांची सर्व जबाबदारी घ्यावी. त्यांचेही लसीकरण केले जाईल. धार्मिक स्थळांवर देखील काही बंधने येतील. मात्र, शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहील, असे भुजबळांनी सांगितले.
रात्री संचारबंदी तर, दिवसा जमावबंदी -
जिल्ह्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा विस्फोट ! आज 57 हजार 74 कोरोनाबाधितांची नोंद, 222 जणांचा मृत्यू