नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आजपासून नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिक-ठिकाणी नाकेबंदी केली आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. 12 मे ते 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला असून, आज दुपारी 12 वाजेपासून नाशिक जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. या काळात नागरिकांना फक्त मेडिकल कामासाठी ते पण ठोस पुरावा असेल तरच घराबाहेर पडता येणार आहे, विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान नागरिकांना या दहा दिवसांमध्ये किराणा, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक कामासाठी देखील बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी नागरिकांना ऑनलाईन मागवता येणार आहे, मात्र त्याला देखील दुपारी 12 पर्यंतचाच वेळ देण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी नाशिकच्या 13 पोलीस स्टेशनांतर्गत 40 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सहाशे होमगार्ड शहरभर तैनात करण्यात आले आहेत.
...तर नागरिकांवर कठोर कारवाई
कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला आहे, या आदेशाचे उल्लंघन केल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, मात्र तरी देखील नागरिक ऐकत नसतील तर पोलिसी खाक्याचा मार्ग खुला आहे, असेही यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊनपूर्वी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
12 मे पासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान आज लॉकडाऊनला सुरुवात होणार असल्याने मंगळवारी नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. नागरिकांची गर्दी वाढल्याने अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा - पोलीस निरिक्षक पतीचा कोरोनाने मृत्यू, तिसऱ्याच दिवशी डॉक्टर पत्नी कामावर झाली रुजू