नाशिक - अत्यंत तीव्र दुष्काळी म्हैसमाळ गावात सोशल नेटवर्किंग फोरमने पूर्ण केलेल्या योजनेतून पाणी पोहोचले आहे. गावातील महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नाचत-गात या पाण्याचे अनोखे स्वागत केले. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव मागील वर्षी दुष्कळासाठी देशभरात चर्चेत आले होते. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या वाचून सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेने या गावाचा पाणी प्रश्न सोडवण्याचे ठरवले. त्यानंतर मागील दीड वर्षात एसएनएफ टीमच्या अथक परिश्रमातून म्हैसमाळ गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यात यश आले. काल अखेर या प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश लोखंडे, भूगर्भशास्त्रज्ञ डॉ.जयदिप निकम, सोशल नेटवर्कींग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी जि.प. सदस्य गोपाळ धूम, प्रशांत बच्छाव, महेश टोपले, रामदास शिंदे, कवी देवदत्त चौधरी, संदिप बत्तासे, जयदिप गायकवाड, देविदास कामडी, मनोहर जाधव, दिलीप महाले, यशवंतराव धुम, संदिप डगळे आदी उपस्थित होते.
पाण्यामुळे सुटणार सामाजिक प्रश्न
एसएनएफच्या "पाण्याच्या बदल्यात वृक्ष संवर्धन" या योनजेअंतर्गत गावात वृक्षारोपण करण्यात आले. या रोपांची निगा राखणे ते वाढवण्याची गावकऱ्यांनीही आनंदाने जबाबदारी घेतली. यासोबतच गावात पाणी आल्याने गाव हागणदारीमुक्त करण्याचाही गावकऱ्यांनी केला. पाण्याच्या अभावामुळे आमच्या गावातील मुलांशी लग्न करायला मुली तयार नव्हत्या. गेल्या काही दिवसात सुटलेल्या पाणी प्रश्नामुळे आता तरुणांची लग्नही व्हायला सुरुवात झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
एसएनएफ टीम - तांत्रिक सहकार्य
करुणा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई - पाईप्स
इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट - सिमेंट
जे.एल. नरसिंहन, हैदराबाद - वीजपंप
धूम कुटुंबीय - विहिरीसाठी मोफत जागा
म्हैसमाळ गावकरी - श्रमदान
ग्रामपंचायत रोंघाणे - पाण्याची टाकी
सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव देशभरात भीषण दुष्काळासाठी गाजलेले होते. गेल्या वर्षी सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी या गावाची समस्या राष्ट्रीय पातळीवर मांडली होती. या गावच्या पाणी टंचाईची माहिती मिळाल्यावर एसएनएफने हा प्रश्न हाती घेतला. परिसराची पहाणी केल्यावर अडीच किलोमीटर अंतरावर वर्षभर पाणी असलेले धरण असल्याचे लक्षात आले. तिथे विहीर खोदून गावात पाणी आणणे शक्य होते. या धरणाच्या काठावर शेती असलेल्या धूम कुटुंबीयांनी एसएनएफ टीमने केलेल्या विनंतीला मान देत विहिरीसाठी मोफत जागा दिली. या जागेवर गावकऱ्यांनी श्रमदानातून विहीर खोदली.
तिला भरपूर पाणी लागल्यावर ग्रामपंचायतने गावात टाकी बांधली. मुंबईची करुणा ट्रस्ट, ईनरव्हील क्लब ऑफ मुंबई वेस्ट, जे.एल. नरसिंहन यांनी पाईप्स, मोटार आणि इतर साहित्यासाठी मदत केली. गावकऱ्यांनी श्रमदानातून चर खोदले आणि पाईपलाईन पूर्णत्वास गेली. खरे म्हणजे मे महिन्यातच गावात पाणी आल्याने यावर्षी लोकांचे पाण्यासाठी हाल झाले नाहीत. तथापी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे लोकार्पण उशिरा करण्यात आले. अशा रितीने फोरमच्या अथक परिश्रमातून हे कार्य साकारण्यात आले. गावात रात्री पहाटे विहिरीत उतरून हंडाभर पाण्यासाठी तासंतास तिष्ठत बसावे लागत होते. मात्र आता गावकऱ्यांना गावातच पाणी उपलब्ध झाले आहे.
राज्यातील सर्वाधिक टंचाईग्रस्त गाव म्हणून म्हैसमाळची ओळख या जल अभियानामुळे पुसली गेली असून सोशल नेटवर्किंग फोरमने विविध माध्यमातून व मदतीतून हा आवाहनात्मक प्रकल्प पूर्णत्वास नेल्याने ग्रामस्थ व महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता, असे सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.