नाशिक - अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 23 व्यापाऱ्यांकडून 1 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही माहिती अन्न व औषध हे प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी दिली आहे. उत्सवाच्या काळात दुकानदारांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सण-उत्सव लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमित कारवाईला सुरुवात केली आहे.
मागील सहादिवसांपासून ही कारवाई वेगाने सुरू असून आतापर्यंत एकूण 54 व्यापाऱ्यांची दुकाने वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे तपासण्यात आली. त्यापैकी बेस्ट बिफोर डेट न टाकणाऱ्या सहा दुकानांमध्ये त्रुटी आढळून आल्या असून ही दुकाने एफडीएच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे समोर आले आहे. या सहा दुकानदारांवर चार दिवसात कारवाई करून त्यांच्याकडून 17 हजार रुपये दंड वसूल केला आहे. येत्या काळातही ही कारवाई अजून गतिमान करण्यात येणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले आहे.
अॅनलॉक झाल्यानंतर अनेक लोकांनी खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे अनेक लोक परवाना न घेताच व्यवसाय करत आहेत. तसेच बेस्ट बिफोर डेट न टाकणाऱ्यावर देखील आता अन्न व औषध विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या 6 दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांकडून जवळपास 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची एफडीएचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी दिली आहे.