अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नद्या-नाल्यांना पूर आला. त्याचा फटका आडगाव, पातूर व काटसूर परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतात पेरलेले सर्व बियाणे पावसाने खरडून नेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. त्यानंतर पावसाने चार ते पाच दिवस दडी मारली. त्यामुळे पेरलेले बियाणे उगवणार की नाही? अशी भीती शेतकऱ्यांना होती. त्यातच मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काटसूर, पातूर, आडगाव या गावातून वाहणाऱ्या पेढी नदीला पूर आला. नदीचे बांध फुटले. त्यामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरल्याने पेरलेले बियाणे खरडून नेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती तहसीलदारांना दिली असून महसूल विभागाचे कर्मचारी पिकांची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.