दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या मार्गी लावण्यात याव्या, यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग क्रांती आंदोलन शिष्टमंडळाने आज (मंगळवारी) पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आणि अपमानास्पद वागणूक दिल्याने प्रहारचे तालुकाप्रमुख सुकदेव खुर्दळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी समस्या मार्गी लावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिले. यासंबंधी त्यांनी निवेदनी गटविकास अधिकारी यांना दिले.
दिंडोरी पंचायत समिती अंतर्गत दिव्यांग बांधवासाठी मंजूर करण्यात आलेल्या घरकुल योजनेचा निधी बांधकाम पुर्ण झाल्या नंतरही सात ते आठ महिने कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही हा निधी लाभार्थींच्या खात्यावर वर्ग झालेला नाही. ग्रामपंचायत स्तरावर पाच टक्के निधी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच रोजगार हमी योजना अंतर्गत दिव्यांगाना जॉब कार्ड वितरित करण्यात यावे आणि अन्य योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, आदींबाबत सविस्तर चर्चा करून गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच मांडण्यात आलेल्या समस्या मार्गी न लागल्यास पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करत असताना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे दिव्यांग बांधव आणि गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला होता. यावेळी दिव्यांगाना शासकीय कार्यालयात देण्यात येणाऱ्या वागणुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रहार तालुकाप्रमुख सुकदेव खुर्दळ, दिव्यांग क्रांती आंदोलनचे तालुकाप्रमुख जयंत थेटे, शितल बोबंले, नानू मनियार, निंबेकर आदी दिव्यांग बांधव हजर होते.