नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने या वर्षी शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले असून मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या निमित्ताने अनेक मंडळीनी सामाजिक बांधीलकी जपत समाज उपयोगी कार्यक्रम घेतले. नाशिकच्या गंगापूर रोड येथील सावरकर नगर मित्र मंडळाच्या वतीने नागरीकांना 500 तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
नाशिक मध्ये मागील चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले असून नागरीकांना कोरोनाचे नियमांचे काटेकोर पणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. लग्न सोहळे, कार्यक्रमात फक्त 100 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव यंदाच्या शिवजयंती उत्सवावर देखील दिसून आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने या वर्षी शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले असून पारंपरिक मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. अनेक मंडळांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, शहरात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. युवकांनी मोटरसायकल वरून भगवे झेंडे हातात घेत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत रॅली काढली. भगवे झेंडे पताका या मुळे नाशिक शहर भगवमय झाले होते. या निमित्ताने अनेक मंडळीनी सामाजिक बांधीलकी जपत समाज उपयोगी कार्यक्रम घेतले. नाशिकच्या गंगापूर रोड येथील सावरकर नगर मित्र मंडळाच्या वतीने नागरीकांना 500 तुळशीच्या रोपांचे वाटप करून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला तसेच काही ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एकूणच नाशिक मध्ये शिवजयंती उत्साहात पण शांततेत साजरी करण्यात आली.