येवला (नाशिक) - शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सम-विषम तारखेला दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी याबाबत नियमावली दर्शविणारे पत्रक काढले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. शहरात सध्या १२ कंटेनमेंट झोन आहे. त्यामध्ये मौलाना आझाद रोड, ओम साई कॉलनी, गंगा दरवाजा, ग्रामीण रुग्णालय, म्हसोबा नगर, मोरे वस्ती, मिल्लत नगर, कुक्कर गल्ली, मुलतानपुरा, नागड दरवाजा, रेल्वे स्टेशन, बालाजी गल्ली यांचा समावेश आहे. या कंटेनमेंट झोनमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाली असली तरी हॉटेल्स, नाष्टाच्या गाड्या, सलून दुकाने बंद राहणार आहेत. तर शहरातील इतर दुकाने सम-विषम तत्त्वावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास नगरपरिषदेने परवानगी दिली आहे. त्यात शहरातील उत्तरेकडे व पूर्वेकडे तोंड करून असलेली दुकाने सम तारखेस व दक्षिणेकडे व पश्चिमेकडे तोंड करून असलेली दुकाने विषम तारखेस उघडण्यात येणार आहेत. खरेदीसाठी जवळच्या बाजारात जाण्यासाठी वाहनांचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच दुकानात पाच ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. सॅनिटायझर व मास्कबाबत दिलेले नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानावर भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी जागा आखून दिली आहे. याच ठिकाणी भाजी-विक्री व फळ-विक्री करावी असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. शहरात अन्यत्र कुठेही भाजी व फळे विक्री करताना दिसल्यास त्यांच्या कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.