नाशिक - शहरातील मॉल्समध्ये पार्किंगची सुविधा मोफत करण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतरही मॉल व्यवस्थापकांनी पार्किंगच्या नावावर पैसे उकळणे सुरूच ठेवल्याकारणावरून शिवसैनिकांनी बुधवारी सिटी सेंटर मॉल परिसरात आंदोलन करून पार्किंगच्या नावावर सुरू असलेली वसुली थांबवली.
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये मॉलपार्किंग मोफत करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत आंदोलन केल्यानंतर पालिका प्रशासनाने मॉलमधील पार्किंग मोफत करण्याचे आदेश मॉल व्यवस्थापकांना दिले होते. मात्र, प्रशासनाचा आदेश मिळूनही मॉल व्यवस्थापनाने नाशिककरांकडून पार्किंगचे पैसे उकळणं सुरूच ठेवले. याच मुद्द्यावरून आक्रमक होत बुधवारी नाशिकमध्ये शिवसैनिकांनी सिटी सेंटर मॉल परिसरात आंदोलन करत पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली वसुली बंद केली.
पुण्यापाठोपाठ नाशिक शहरातील मॉल्समधील पार्किंग मोफत करण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. नगररचना विभागाने शहरातील सिटी सेंटर, पिनॅकल, बिग बाजार या मॉल्सना मंगळवारी नोटिस बजावल्या होत्या. विकास नियंत्रण नियमावलीत अधिकचे टंचाईक्षेत्र दिल्याने नागरिकांना पार्किंगची सुविधा मोफत देण्याचे निर्देश या नोटीसद्वारे मॉल्सचालकांना मंगळवारी देण्यात आले होते.
पार्किंगसाठी नागरिकांकडून शुल्क घेताना आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला. यानंतरही मॉल व्यवस्थापकांनी पार्किंगचे पैसे उकळणे सुरूच ठेवले होते. याच मुद्द्यावरून आक्रमक होत बुधवारी नाशिकमध्ये शिवसैनिकांनी सिटी सेंटर मॉल परिसरात आंदोलन करत पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली वसुली थांबवली.