मालेगाव Advay Hire Police Custody : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (उबाठा) उपनेते अद्वय हिरे यांना मालेगाव न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या फसवणुकीप्रकरणी त्यांना बुधवारी (15) भोपाळमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सकाळी न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालय परिसरात हिरे समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता.
न्यायालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी : अद्वय हिरे यांना आज मालेगाव सत्र न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हिरे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं समजताच त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी न्यायालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी झाली.
अटकपूर्व जामीन फेटाळला : जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी अद्वय हिरे यांच्यावर मालेगाव येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अद्वय हिरे यांनी मालेगाव न्यायालयात नंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केला होता. दोन्ही न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना भोपाळमधून अटक केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं 20 नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयाबाहेर हिरे समर्थक मोठ्या संख्येनं जमले होते. त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात देखील यावेळी घोषणाबाजी केली.
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद : अद्वय हिरे यांच्यावर झालेली कारवाई राजकीय हेतूनं झाली आहे. सत्ताधाऱ्यांना कोणाचाही विरोध नसावा, म्हणून त्यांनी हिरे यांना अटक केल्याचा आरोप ठाकरे उद्धव ठाकरे यांनी केलाय. आम्ही कुणाला घाबरत नाही. मी, माझा संपूर्ण पक्ष अद्वय यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. मी जास्त बोलणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर आमच्याकडं अनेक तक्रारी आल्या आहेत. अनेकांवर आरोप झाले आहेत. काहींवर यापूर्वीच आरोप झाले आहेत. त्यामुळं सत्तेत आल्यानंतर या सर्वांची चौकशी पूर्ण करू, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा -