नाशिक - राज ठाकरे सध्या विधासभा निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत नाहीत. विधानसभा निवडणुकांवर सर्व पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव आपल्याला मान्य नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पवार सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या योजनांची पोलखोल करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबत पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जोपर्यंत ईव्हीएम हटवले जात नाही, तोपर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाने निडणूक लढवू नये. तसेच निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला. मात्र, असे केले तर देश हुकुमशाहीकडे वाटचाल करेल. देशात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही. यामुळे मनसेला सोबत घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. मनसेची या विधानसभा निवडणुकीत भूमिका काय होती, त्यांनी स्पष्ट केली आहे. मात्र, मनसे पक्षाकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही. तसेच आगामी निवडणुकीत मनसेची काय भूमिका राहणार याबाबत देखील कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकिय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांवर सर्व पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव दिल्याचे पवारांनी सांगितले. यासंदर्भात माझी आणि राज ठाकरे यांची चर्चा झाली. निवडणुकीवर बहिष्कार टाका ही त्यांची भूमिका आम्हाला मान्य नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.