नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्व, शिक्षणतज्ञ डॉ. मो स गोसावी यांचे आज आकस्मिक निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची शरद पवार यांनी भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गोसावी मूळचे पैठणचे होते. पण त्यांनी नाशिक कार्य क्षेत्र निवडले होते. मुंबई, नाशिक आणि पालघर येथे त्यांचे मोठे शैक्षणिक कार्य आहे. त्यांच्या संस्थेतून दर्जेदार शिक्षण देणे हे त्यांचे काम होते. त्यात गोसावी यांचे मोठे योगदान आहे.
शैक्षणिक क्षेत्रात पोकळी : गोसावी यांच्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रात झालेली पोकळी भरून निघणार नाही. त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले आहेत. विविध क्षेत्रांत डॉ. गोसावी नावाचा लौकिक राहील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. यावेळी हेमंत टकले, कोंडाजीमामा आव्हाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गोखले एज्युकेशन शिक्षण संस्था १०५ वर्षे जुनी आहे.
पार्थिव अंत्यदर्शनासाठी बीवायके महाविद्यालयात : सोसायटीचे सचिव तथा महासंचालक प्रा. डॉ. मो. स. गोसावी यांचे पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता येताच सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिव सकाळी १० वाजता येथील काँलेज रोड बीवायके महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी ५.३० वा. पार्थिवावर नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षकाची भूमिका : शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून गोसावी सर यांची ओळख होती. डॉ. मो. स. गोसावी यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) उत्तीर्ण केल्यानंतर प्रसासकीय सेवेची निवड न करता शिक्षण क्षेत्राची निवड केली होती. त्यांनी या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा उमटविलेला होता. त्यांची वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील आदर्श शिक्षकाची भूमिका सर्वांना प्रभावित करणारी होती.
हेही वाचा :