नाशिक- या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजप सेनेला स्पष्ट बहुमत दिले आहे. सत्तेचा उन्माद महाराष्ट्रात करता येत नाही, हे जनतेने दाखवून दिले आहे. लोकांचा निर्णय आम्हाला विरोधात बसवण्याचा आहे. आम्ही ती भूमिका पार पाडू. मात्र, आज जो चाललाय तो सर्व पोरखेळ आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेना भाजपवर केली आहे. नाशिक येथे परतीच्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा- देशाच्या उत्पादन क्षेत्रात मंदावली हालचाल; गेल्या दोन वर्षात 'पीएमआय'ने नोंदविला निचांक
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. झालेल्या नुकसानीबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारला माहिती देणार असल्याचेही पवार म्हणाले.
हेही वाचा- 'भाजपला सरकार स्थापन करता आले नाही तर, पर्यायी सरकार स्थापन करू'
राज्य अडचणीत असताना यांना जवाबदारी पार पाडता येत नाही ही खेदाची गोष्ट आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या विधानावर बोलताना पवार म्हणाले, मुनगंटीवार यांनी राष्ट्रपतींचे अधिकार सुपूर्द केले का हे मला माहित नाही. राज्यपाल त्यांना एवढच सांगु शकतात की तुम्ही बहुमत सिद्ध करा. निकाल लागून आठवडा होत आला तरी अजून सरकारच स्थापन नाही. त्यामुळे जनतेचं मोठं नुकसान होत आहे.
संजय राऊत यांनी माझी भेट घेतली असल्याचेही पवार यांनी सांगितले. 9 तारखेला राम मंदिराबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लोकांचा उद्रेक होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. १९९२ साली आलेली अवस्था सावरायला खूप वेळ लागला, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी काळजी घेणं गरजेच असल्याचं पवार म्हणाले.