मालेगाव (नाशिक) Dada Bhuse On Sanjay Raut : पालकमंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्या प्रकरणी आज (२ डिसेंबर) संजय राऊत कोर्टात हजर झाले. कोर्टानं त्यांना, दोघं सामंजस्य करून खटला मिटवाल का? असा प्रश्न केला. यावर संजय राऊत यांनी, "मी खटला दाखल केलेला नाही. त्यामुळे मी तो मागे घेऊ शकत नाही. ज्यांनी खटला केला त्यांना विचारा. मला खटला चालवायचा आहे. माझी तशी तयारी आहे", असं उत्तर दिलं. यानंतर कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला आणि संजय राऊत यांना जामीन मंजूर केला.
भ्रष्टाचार खपवून घेणार नाही : संजय राऊत कोर्टात म्हणाले की, "माझा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. मला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मी प्रश्न विचारणारच. जर प्रश्न विचारल्यावर गुन्हा दाखल होत असेल तर होऊ द्या. मी सर्व सहन करण्याची तयारी केली आहे. मी जेलमध्ये जाईन, पण भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असं घणाघात त्यांनी केला.
दादा भुसेंवर गुन्हा दाखल करावा : यावेळी बोलताना संजय राऊत यांनी दादा भुसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. "भविष्यात मालेगावला आमचा आमदार होणार आहे. आम्ही देखील दादाचे दादा आहोत. आता भुसेंवर गुन्हा दाखल करावा", असं संजय राऊत म्हणाले. यावेळी कोर्टात संजय राऊत यांच्यासोबत मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते.
दादा भुसेंची खालच्या पातळीवर टीका : संजय राऊत यांच्या टीकेला पालकमंत्री दादा भुसे यांनी शेलक्या भाषेत उत्तर दिलं. राऊत यांचा दलाल म्हणून उल्लेख करत, त्यांना मालेगावची माफी मागावीच लागेल, असं भुसे म्हणाले. "संजय राऊत हा दलाल माणूस आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसची दलाली करतात. ते शिवसेना संपवायला निघाले, त्यामुळे त्यांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये", असं भुसे म्हणाले. "संजय राऊत यांच्या सांगण्यानं काही फरक पडणार नाही. मालेगावची जनता ठरवेल कोण आमदार होईल", असं त्यांनी उत्तर दिलं.
काय आहे प्रकरण : संजय राऊत यांनी दादा भुसेंवर गिरणा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप लगावला आहे. तसेच ललीत पाटील ड्रग्ज प्रकरणावरून देखील त्यांनी दादा भुसेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर दादा भुसेंनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला.
हेही वाचा :
- शरद पवारांची पुण्यात तुफान फटकेबाजी, अजित पवारांना सडेतोड उत्तर; पाहा संपूर्ण पत्रकार परिषद
- मोदींनी सिंचन घोटाळ्याचे आरोप कुणावर केले, शरद पवारांचा सवाल, अजित दादा प्रफुल पटेलांच्या दाव्यांचा घेतला समाचार
- Sanjay Raut News : 2024 ला पोलिसांचा हिशेब केला जाईल- अद्वय हिरे अटक प्रकरणावरून संजय राऊत यांचा इशारा