नाशिक - जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त नाशिकच्या डब्लू. ओ. डब्लू. या ग्रुपकडून ४० हजार महिलांना सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल बॅगचे वाटप करण्यात आले आहे. मासिक पाळी विषयी महिलांचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या ग्रुपच्यावतीने महिलांना मार्गदर्शन केले जात आहे.
२८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, मोठ्या प्रमाणात प्रबोधन होऊनही अद्याप देशात मासिक पाळी विषयी उघडपणे बोलले जात नाही. एकीकडे वैज्ञानिक प्रगती होत असतानाही समाजात मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अनेक महिलांना शारिरीक आजरांचा सामना करावा लागतो. मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या समस्याबाबत महिलांमध्ये प्रबोधन व्हावे, यासाठी नाशिकमधील महिलांच्या डब्लू. ओ. डब्लू. ग्रुपने एक मोहीम हाती घेतले आहे. मासिक पाळी विषयी महिलांचे असलेले गैरसमज दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन या ग्रुपच्यावतीने केले जात आहे.
यासाठी डब्लू. ओ. डब्लू. ग्रुप गेल्या ६ महिन्यापासून 'रेड डॉट' या सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल कागदी बॅगचे वाटप करत आहे. यासाठी शाळा, महाविद्यालय, स्लम एरिया, सार्वजनिक ठिकाणी महिलांना प्रबोधन केले जात आहे. ही मोहीम तळागाळातील महिलांपर्यँत पोहोचवण्याचा मानस या ग्रुपच्या महिलांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमात डब्लू. ओ. डब्लू. ग्रुपच्या अध्यक्षा रेखा देवरे, विद्या मुळाने, वैशाली गुप्ता, आदया टकले, अश्विनी न्याहारकर यांनी पुढाकार घेतला आहे.