नाशिक - मराठा आरक्षणासाठी सर्व संघटना एकत्र आल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील सामुदायिक नेतृत्त्वात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. तसेच आरक्षणासाठी कोणी एकाने पुढाकार न घेता सामुदायिक प्रयत्नांनी ते मिळवायला हवे, असेही ते म्हणाले. विखे पाटील येथे बोलत होते.
संभाजी राजेंची भूमिका वैयक्तिक -
राज्यात एकूण २६ संघटना आरक्षणासाठी काम करत आहेत. प्रत्येक संघटनेला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्या संघटना एकत्रितपणे भूमिका मांडत आहेत. सामूहिक नेतृत्वात संभाजीराजेंनी सहभागी व्हावे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी खासदार संभाजी महाराजांचे नेतृत्व मान्य आहे की नाही हा प्रश्न नाही. सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन भूमिका घेतली पाहिजे. संभाजीराजे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केलेले आहे. मात्र, सामूहिक नेतृत्वात त्यांनीसुद्धा सहभागी झाले पाहिजे. संभाजी राजे मांडत असलेली भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका असून सगळ्या संघटना एकत्र आल्यानंतर संभाजी राजेंनीसुद्धा सहभागी व्हावे, असे आवाहनही विखे पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी आणि विरोधीपक्ष दोघेही गंभीर नाही - संभाजीराजे भोसले
...तर संभाजी राजेंनी आमचा पाठिंबा -
मराठा आरक्षणासाठी संभाजी राजेंनी सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना पाठिंबाच देऊ, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले. संभाजी महाराजांनी पंतप्रधानांना वेळ मागितली की नाही हे माहिती नाही. त्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. कोणच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हवे. राज्य सरकारकडून निष्काळजीपणा आणि वेळकाढूपणा करत असल्याची टीका त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. राज्यातील मंत्र्यांमध्ये देखील आरक्षणाबाबत विसंगती आढळून येत असून कोणी एकाने पुढाकार घेऊन नाही तर सामुदायिक प्रयत्नांनी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन करावे. मराठा आरक्षणासाठी आता केंद्र आणि राज्यावर दबावासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, हे माझे व्यक्तिगत आवाहन असून भाजपची भूमिका स्पष्ट झालेली आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले आहे.
भूमिका मांडणार; २७ मे पर्यंत मराठा समाजाने शांत राहावे - संभाजीराजे छत्रपती
'मी शांत आहे ही महाराजांची शिकवण आहे. मी आक्रमक होण्याआधी मार्ग काढणार, मी महाराष्ट्र पिंजून काढतोय. मराठा आरक्षणप्रश्नी अभ्यासू लोकांशी चर्चा करतोय. २७ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यानंतर मुंबईत स्पष्ट भूमिका मांडणार आहे. तसेच सगळ्या मराठा आमदार आणि खासदारांना माझी वार्निंग असून मराठा समाजाने २७ मे पर्यंत शांत रहावे,' असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.
हेही वाचा - देगलूर-बिलोली मतदारसंघाला पोटनिवडणुकीचे वेध; उमेदवारीसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा