नाशिक - भारतातील एकमेव अशा पंचवटी एक्सप्रेसच्या आदर्श बोगीचा १२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या हस्ते रेल्वेत केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. समीर भुजबळ यांनी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय बिपीनभाई गांधी यांच्या फोटोला गुलाबपुष्प वाहुन आदरांजली वाहीली. यावेळी समीर भुजबळ यांच्या सोबत त्यांच्या पत्नी डॉ. शेफाली भुजबळ देखील उपस्थित होत्या.
यावेळी समीर भुजबळ यांनी मुंबई ते नाशिकरोड प्रवास करत प्रत्येक रेल्वे बोगीत जाऊन रेल्वे प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी त्यांनी महिलांच्या बोगीतही जाऊन महिलांना प्रवासात येणाऱ्या अडचणी जानून घेतल्या. यावेळी उच्चपदस्थ अधिकारी, व्यापारी, उद्योजक आदींसह जाणकार व्यक्तीशी भुजबळ यांनी चर्चा केली. तर चाकरमान्यासह रेल्वे प्रवाशांसोबत रेल्वेने प्रवास करताना येणाऱ्या अडचणी समजून घेत आगामी काळात प्रशासनाकडून माहिती घेत रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नियमित रेल्वेने प्रवास करणारऱ्या रेल्वे प्रवाशांना रेल्वेने प्रवास करतांना मोठी तारेवरची कसरत लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वेप्रवासी विषेशतः महिला प्रवाशांच्या अडचणीसोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास समीर भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी नैना मित्रा, शितल खेडकर, गीता साबळे, आरती माळी, प्रमोद कातकाडे, विवेक गायकवाड,पंढरीनाथ घुगे, तुषार वाघ आदी रेल्वे प्रवासी उपस्थित होते.