मालेगाव (नाशिक) - लडाखजवळील गलवान येथे कर्तव्य बजावत असताना दोन जवान नदीत पडले होते. त्यांना वाचविताना लष्करी जवान सचिन मोरे यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच त्यांचे मूळगाव असलेले साकुरी (ता.मालेगाव) गावासह नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरू असताना दोन जवान नदीच्या पाण्यात पडले. त्यांना वाचविताना महाराष्ट्राचे सुपुत्र सचिन मोरे यांना वीरमरण आले आहे. ही घटना बुधवारी (दि. 24 जून) घडली.
सचिन मोरे हे 115 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये सेवा बजावत होते. आज (दि. 25 जून) सकाळी लष्कराकडून त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली. सचिन मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. मोरे यांची लष्करात एक वर्ष सेवा बाकी होती. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच साकुरी गावासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, पूर्व लडाखच्या सीमेवरून भारत-चीनमध्ये संघर्ष वाढल्याने तणावात भर पडली. गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्यांकडून हिंस्रक झडप घालण्यात आली होती. यात भारताचे २० जवानांना वीरमरण आले होते.
हेही वाचा - ग्राहकांचे वीज बिल तीन टप्प्यात आकारावे, शिवसेनेची मागणी