नाशिक- वाहनधारकांची कागदपत्रे, परवाने, पीयूसी तसेच हेल्मेट तपासणी करणे हे काम परिवहन विभागाचे (आरटीओ) आहे. त्यामुळे, यापुढे हा विभागच कागदपत्रांची तपासणी करेल. वाहतूक पोलीस हे फक्त वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम करेल. ते दंडाच्या स्वरुपातील महसूल गोळा करणार नाही. ते काम पोलिसांचे नाही, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांची अवैध धंद्यांबाबत संयुक्त कारवाई करण्यासंदर्भात बैठक झाली. यात बोलताना पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी ही माहिती दिली. शहरातील वाहतुकीची होणारी कोंडी फोडणे हे मुख्य काम वाहतूक पोलिसांचे आहे. पण, पोलीस कोंडी होत असतानाही अनेकदा दंड वसूल करण्यावर लक्ष देतात. असे वारंवार निदर्शनास येते. वाहनधारकाला दंड करून तो महसूल जमा करणे हे पोलिसांचे काम नाही. यापूर्वी तसे काम होत होते. पोलिसांना महसूल वसुलीचे टार्गेट देण्यात येत होते. पण, आता पोलिसांना असे कोणत्याही प्रकारचे टार्गेट दिले जाणार नाही, असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय म्हणाले.
महसूल वसूल करणे ही जाबबदारी आरटीओ विभागाची आहे. या विभागाने त्यांचे काम करावे. त्यांना मदत म्हणून पोलीस सहकार्य करतील, असे पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी स्पष्ट केले. वाहन तपासणीच्या नावाखाली वाहतूक कर्मचारी यापूर्वी वाहनधारकांचा मानसिक व आर्थिक छळ करीत होते. त्यामुळे, अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवत. पोलीस कर्मचारी व वाहन धारकांमध्ये यापूर्वी हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत शहरातील वाहतूक पोलिसांना यापुढे वाहने आडवून कागदपत्रांची तपासणी करता येणार नाही, असे दीपक पाण्डेय म्हणाले.
तसेच, ज्यावेळी वरिष्ठ पोलीस कार्यालयाकडून नाकाबंदी करण्याबाबत, वाहन तपासणीबाबत आदेश येईल तेव्हाच वाहतूक कर्मचार्यांना तसापणी करता येणार असल्याचे पाण्डेय यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- भूसंपादन घोटाळ्यात महानगरपालिका आणि बिल्डरांचे लागेबंध; नगरसेवकाचे महापौरांच्या दारात उपोषण