नाशिक - महायुतीत समावेश असून सुद्धा स्थानिक पातळीवर भाजप शिवसेनेकडून विचारले जात नसल्याने नाशिकमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा समितीच्या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार देण्याचा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती रिपाइंजिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली.
महायुतीच्या बैठकांना बोलवले जात नाही, तसेच कार्यक्रमांमध्ये रिपाई नेत्यांचे फोटोही लावले जात नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. जिल्ह्यातील स्थितीबाबतचा अहवाल ४ एप्रिलला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देण्यात येणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.
आरपीआय आठवले गट केंद्रात आणि राज्यात महायुतीत सहभागी आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील आरपीआय आठवले गटाला विश्वासात घेतले जात नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नाशिक आणि दिंडोरीमधील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आठवले गटाला डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. काही दिवसांपुर्वी नाशिकच्या एका हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीचे निमंत्रण सुद्धा भाजप आणि शिवसेनेने दिले नाही, तसेच युतीच्या मेळाव्यात रामदास आठवले यांचा फोटो सुद्धा लावण्यात आला नसून हेतूपुरस्कार आठवले गटाला डावलले जात असल्याचे आरपीआय आठवले गटाचे मत झाले आहे.
नाशिक आणि दिंडोरीमधून रिपाइने स्वतंत्र उमेदवार द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे करणार असल्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीचा अहवाल ४ एप्रिलला मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय आरपीआयच्या बैठकीत ठेवला जाणार असल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात रिपाइंची ताकद मोठी असून नाशिकमधून मराठा समाजाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी आठवले यांच्याकडे करणार असल्याचे ही लोंढे म्हणले. भविष्यात जर रिपाइंने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून उमेदवार उभे केले तर युतींच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार हे नक्की.