नाशिक - मुंबई महामार्गावरील कसारा घाटातील मुंबईकडून नाशिककडे येणाऱ्या रस्त्याला तडे गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या एकेरी मार्गानेही वाहतूक सुरू असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या २ तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
मागील ३ दिवसांपूर्वीही कसारा घाटातील जुन्या मार्गावरील रस्त्याला तडे गेले होते. हे तडे बुजवल्यानंतर सुद्धा आता पुन्हा एकदा ही समस्या समोर आली आहे. या भागात होणाऱ्या जास्त पावसामुळे हा रस्ता खालून खचतच असून मोठ्या प्रमाणात रस्त्यांना तडे गेले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी लतिफवाडी ते घाट देवी मंदिर पर्यंत वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहने आणि नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत.
या घाटातील रस्त्याला का पडतात वारंवार तडे -
पावसाळ्यात कसारा भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. डोंगरावरुन येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज नसल्याने हे पाणी रस्त्यामध्ये झिरपते परिणामी रस्ता ठिसूळ होऊन त्याला तडे जातात.