नाशिक- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ७०० च्या जवळपास पोहोचली आहे. या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभाग युद्धपातळीवर काम करत आहे. तर, जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांना एक आठवड्याच्या शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. असेच आपले कर्तव्य बजावून एक आठवड्यानंतर घरी परतलेल्या परिचारिका अनिता अंकाईपगार यांचे त्यांच्या सोसायटीतील रहिवाशांनी पुष्पहार घालून आणि पेढे भरूवून स्वागत केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून जिल्ह्याची परिस्थिती देखील दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रेडझोन असलेल्या नाशिक जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही जवळपास ७०० एवढी असून या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभाग देखील सज्ज आहे. कोरोना रुग्णांचा वाढत आकडा लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीने नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांना एक एक आठवड्याच्या शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. याच रुग्णालयात परिचारिका जोनिता अंकाईपगार कोरोनाबाधितांवर उपचार करतात. दरम्यान, जोनिता यांची शिफ्ट पूर्ण झाल्याने आज एक आठवड्यानंतर त्या आपल्या घरी परतल्या. यावेळी सोसायटीतील लोकांनी त्यांना पुष्पहार घालून आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केल.
आठवडाभर कोरोना रुग्णांची सेवा करून घरी परतलेल्या जोनिता या राहिवाशांनी केलेल्या स्वागतामुळे भारावून गेल्या होत्या. खरं तर अनेक ठिकाणी नागरिक कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्याच घरी राहू देण्यास बंदी घालत आहेत. मात्र, जोनिता यांच्या सोसायटीतल्या रहिवाशांनी त्यांचे केलेले स्वागत हे आरोग्य कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
हेही वाचा- लॉकडाऊनचा फटका : लाखो रुपये खर्चून पिकवलेल्या रंगीत शिमला मिरचीवर फिरवला रोटर