नाशिक - जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये थेट बाधीत रुग्णांची त्यांचेच नातेवाईक काळजी घेत असल्याचे समोर आले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा सगळा प्रकार धक्कादायक असून व्हिडिओ मध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या आसपास नातेवाईकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या सगळ्या दरम्यान उपचार करण्यासाठी किंवा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित नाहीये. यामुळे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमीच चर्चेत असते.नेहमीच या रुग्णालयातील कामकाजाच्या तक्रारी समोर येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईकच रुग्णाची काळजी घेत असल्याचं भयावह वास्तव समोर आणलय, उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी. बाधित रुग्णाच्या नातेवाईकांनीं विव्हिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयाने कारवाई केली असून कोरोना वार्डात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असल्याचं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक निखिल सौंदाणे यांनी सांगितलंय.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पाठोपाठ नाशिक शहर कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरत आहे. नाशिक शहरात गेल्या महिनाभरापासून दिवसाला १०० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडत आहे. यामुळे नाशिक शहरातील कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक भीषण होत असताना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात घडत असलेला हा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बाधित रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेतल्या नंतर शासकीय रुग्णालयात त्यांची काळजी घेत नाहीत. तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचारी फिरकत देखील नसल्याचा प्रकार समोर आल्यानं शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.