नाशिक - उद्योगांना चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन उद्योग, संरक्षण खात्यातील साधन सामग्री यांच्या उत्पादनासाठी अथवा आयटी इंडस्ट्री यापैकी एक प्रमुख प्रकल्प नाशकात उघडण्यासाठी टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी अनुकूलता दर्शविली आहे. नाशिकच्या भाजप उद्योग आघाडीने मुंबईमधे जाऊन रतन टाटा यांची भेट घेतली. त्यावेळी टाटांनी उद्योगा संदर्भात सकारात्मकता दर्शवली असल्याचे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रमुख प्रदीप पेशकार यांनी सांगितले आहे.
नाशिकच्या भाजप उद्योग आघाडीने मुंबईमधे जाऊन रतन टाटा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रतन टाटा यांना नाशिक मधील पायाभूत सुविधा, विमानतळ, हवामान आणि पाण्याची उपलब्धता या बाबतीत माहिती दिली. तसेच उद्योगांमध्ये केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या नवीन धोरणानुसार शस्त्र निर्मिती कारखान्यांना चालना देण्यात येणार आहे. नाशकात डिफेन्स इनोव्हेशन हब ची घोषणा झाली असून त्या अनुषंगाने हा प्रकल्प उभा राहू शकतो. तसेच टाटा ग्रुपचे ग्रोबल प्रोसेसिंग, डिफेन्स अॅड एरोस्पेस, इलेक्ट्रिक वाहन आणि आयटी इंडस्ट्रीत गुंतवणूक करण्याची विनंती यावेळी टाटा यांना करण्यात आली. यावर त्यांनी सकारात्मकता दाखवत लवकरच प्रकल्पाच्या दोन ते तीन टीम नाशकात पाठवून त्याची पाहणी करतील आणि त्यानंतर लागेच पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही पेशकार यांनी सांगितले.
काही वर्षापासून नाशिकच्या उद्योग व्यवसायावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे. एकही नवीन उद्योग येत नसल्याने बेरोजगारीचा मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यात नाशिकची अर्थव्यवस्था बहुतांशी मोठ्या वाहन निर्मितीवर अवलंबून असून त्यात नवीन नियमानुसार डिझेल इंजिन बंद होत आहेत. त्यामुळे उद्योग अडचणीत सापडले असून या उद्योगांना सरकारच्या धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करावे लागणार आहे. त्यासाठी पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिककरांसमोर बेरोजगारीचे मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे टाटा सारख्या कंपन्या आल्यास नाशिकची अर्थव्यवस्था वाढेल आणि बेरोजगारीचे संकट काही प्रमाणात कमी होऊ शकेल असे देखील पेशेकर यांनी या वेळी सांगितले.