नाशिक - केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे त्वरीत रद्द करावे ह्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करुन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील निफाड चौफुलीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. मात्र काही वेळानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
'नाही तर तीव्र आंदोलन करू'
गेल्या अनेक दिवसांपासून तीन कृषी कायदे रद्द करावे म्हणून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र तरीही केंद्र सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा मात्र जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन स्वाभिमानी संघटना देशात उभे करेल आणि ह्या आंदोलनात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ह्याला केंद्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.