नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे कमी होणारे प्रमाण तसेच जिल्ह्याचा मृत्यूदर देखील राज्याच्या तुलनेत कमी असणे ही समाधानाची बाब आहे, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. आज शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते.
केंद्र सरकारमार्फत कोरोनाच्या कालावधीत सर्वच राज्यांना अन्न धान्याचा पुरेसा पुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी नागरीकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही आठवले यावेळी म्हणाले.
कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होण्यासोबतच जिल्ह्यात रुग्णांसाठी 10 मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणत उपलब्ध आहे. उद्योगांना देखील पर्याप्त ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा साठाही आवश्यकतेनुसार उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे राज्यात राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी पूर्ण झाली असून या फेरीत साधारण 4 हजार 203 बाधित रुग्ण आढळले आहेत. यावरून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यास यश मिळाले आहे. तसेच या मोहिमेच्या दुसऱ्या फेरीचे सर्वेक्षण सद्यस्थितीत सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्यासमोर सादर केली.
सामाजिक न्याय विभागाचा आढावा -
समाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर योजना, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत घडलेले गुन्हे व त्याअंतर्गत देण्यात आलेले अर्थसहाय्य, मातोश्री वृद्धाश्रम आदी योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. याअनुषंगाने प्रलंबित प्रकरणाची माहिती सादर करण्यात यावी, अशा सूचना राज्यमंत्री आठवले यांनी यावेळी दिल्या.