नाशिक- कोरोनाच्या विळख्यात सारेच सापडले आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक, कोरोना रुग्णांना मिळत नसलेली पुरेशा सुविधा, गोरगरिबांचे हाल यासारखे अनेक प्रश्न आहेत. आता त्यासाठी रस्त्यावर उतरायचे, की मंदिर व धार्मिक स्थानांना उघडण्यासाठी आंदोलन करायचे, हे ज्यांचे त्यानेच ठरवावे, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.
शेट्टी हे आज नाशिकच्या सह्याद्री कृषी फार्म, मोहाडी आणि दिंडोरी या ठिकाणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याची नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली. योग्य भाव मिळत नाही म्हणून आपण शेतकऱ्यांसोबत सरकारविरोधात आंदोलन करतो. सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आपण जमावबंदी तोडली. ज्या गायीच्या दुधाची अवहेलना होते, तिला देखील आंदोलनात सोबत घेतले. म्हणून गायीचा छळ केला, जमावबंदी मोडली, मास्क वापरला नाही, असे गुन्हे आमच्यावर दाखल झाले. यापूर्वी शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल आहेत, त्यात अजून एका गुन्ह्याची भर पडली. याबाबत आपल्याला फारसे काही वाटत नाही, असे शेट्टी म्हणाले.
हेही वाचा- नाशिक शहरातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून शिवसेनेचे आंदोलन