नाशिक - नागरिकत्व (सुधारणा) कायद्याविरोधात देशात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. आज (शुक्रवारी) नांदगाव येथे संविधान बचाव समिती, जमेतूल उलेमा, शहर शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यासह नागरिकांच्या वतीने भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. जामा मशीद येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी असंख्य नागरिकांनी यात सहभाग घेतला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा - CAA : हिंसा झाल्यास आम्ही सरकारला विरोध करण्यापासून बाजूला होऊ - ओवेसी
नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असताना त्याचे पडसाद नांदगांव शहरातही उमटले. शुक्रवारच्या विशेष नमाज नंतर मुस्लिम बांधवानी काळ्या फिती लावून मोर्चा काढला. तसेच मोर्चात संविधानाच्या प्रतदेखील आणण्यात आल्या. शहरातील विविध मार्गावरून जाऊन हा मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या.