नाशिक - होळीच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर शहरात पारंपरिक पद्धतीने वीरांची मिरवणूक काढली जाते. कुटुंबातील पूर्वजांचे टाक-खोबऱ्याचा वाटीत टाकून ते वाजत गाजत मिरवले जाते. त्यानंतर गोदावरी नदीत त्यांना स्नान घालून पूर्वजांप्रती श्रद्धा अर्पण केली जाते.
या वीरांच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य 'दाजीबा वीर' आहे. दाजीबा वीर हे नवसाला पावतात अशी अख्यायिका आहे. जुन्या नाशिक आणि रविवार कारंजा अशा दोन ठिकाणाहून दाजीबा वीरांची मिरवणूक नाशिक शहरातून हलगीच्या तालावर वाजत गाजत काढली जाते. विशेषतः अविवाहित मुली-मुले या वीराला बाशिंग वाहून दर्शन घेतात.
या वीराला बाशिंग बांधल्यास अविवाहित मुला-मुलींचे लग्न जमतात, असे येथील लोक मानतात. त्यामुळे या वीराला बाशिंगी वीर असे ही म्हटले जाते. ठिकठिकाणी महिला या वीराचे औक्षण करून दर्शन घेतात. दुपारी चार वाजता निघालेली ही मिरवणूक रात्री उशीरापर्यंत सुरू असते. या वीर मिरवणुकीत लहान मुले विविध वेषभूषा परिधान करून हातात पूर्वजांचे टाक घेऊन सहभागी होतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.