नाशिक: नाशिकच्या करन्सी नोट प्रेस (Nashik Currency Press) मध्ये आता भारतीय चलना सोबतच नेपाळच्या चलनाची देखील छपाई होणार आहे. (printing of Nepal currency). यामुळे येथील करन्सी नोट प्रेस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रेस मजूर संघाचे अध्यक्ष काय म्हणाले: याबाबतीत प्रेस मजूर संघाचे अध्यक्ष जगदीश गोडसे म्हणाले की, "युवा पिढी ही प्रामुख्याने संपूर्ण व्यवहार डेबिटकार्ड, यूपीआय ऑनलाइन प्रकारे करते आहे. त्यामुळे देशातील कागदी चलनाचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे आता एक्सपोर्ट पॉलिसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांची करन्सी प्रिंट करण्याच्या अनुषंगाने भारत सरकार कडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता देशातील चार करन्सी नोट प्रेस पैकी नाशिकच्या करन्सी नोट प्रेसला नेपाळच्या 1 हजार रुपयांची करन्सी छापण्याचे कंत्राट मिळाले आहे. या आधी नेपाळची करन्सी चीन छापत असल्याची माहिती नोट प्रेस मजूर संघाचे अध्यक्ष जगदीश गोडसे यांनी दिली.
या देशांच्या नोटांची देखील झाली आहे छपाई: नाशिकच्या नोट प्रेस मध्ये स्वातंत्र्या पूर्वी चीन, नेपाळ, भूतान, बांग्लादेश, पाकिस्तान या देशांच्या नोटांची छपाई झाली आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात ही छपाई बंद झाली होती. आजही जवळपास 50 ते 60 देश आपले चलन बाहेरच्या देशातून छापून घेतात. त्यामुळे आता नाशिकच्या नोट प्रेस मध्ये एक्सपोर्ट डिपार्टमेंट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून इतर देशांचे देखील करन्सी छापण्याचे काम कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे, असं गोडसे यांनी सांगितले.