नाशिक - येथील दिंडोरी तालुक्यात नगदी पीक संबोधले जाणाऱ्या टमाटा पिकाला उतरती कळा लागली आहे. निर्यातक्षम टमाटा चार ते सहा रुपयापर्यंत विकला जात आहे. तर लाल व गारशेल (कवडी फुटलेला) टमाटा प्रति किलो दोन रुपये प्रमाणे विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हेही वाचा- 'भविष्यात भाजप-शिवसेना एकत्र काम करेल..'
दिंडोरी तालुक्यात टमाटापिकाची लागवड पांडव पंचमीला मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, यावर्षी टमाटा लागवडीच्या वेळीच बेमोसमी पावसामुळे टमाट्याची रोपे खराब झाली. शेतकऱ्यांनी एक रुपये तीस पैसे प्रमाणे रोपची खरेदी करून लागवड केली. मात्र, सततच्या पावसाने टमाटा खराब झाला. पावसाने उघडीप दिल्याानंतर औषधांची फवारणी, मशागत करून एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला. टमाटा बाजारात गेल्यानंतर आक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रति कॅरेट (पंचवीस किलो) 700 ते 800 रुपये भाव मिळत होता. डिसेंबर महिन्यात सुरवातीलाच प्रतिकिलो दिड ते दोन रुपये टमाट्याला भाव मिळत असल्याने केलेला खर्च पण निघाणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे.