नाशिक - प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणुकीत उभ्या राहिल्या असत्या तर प्रचारासाठी गेलो असतो, असे वंचित बहुजन आघाडीचे नते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
प्रियांका यांनी हवा केली. मात्र, उमेदवारी केली नाही. मोदी त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. तसेच काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
ते म्हणाले, मोदी काँग्रेसवाल्यांना सांगतात की तुम्हाला जेलच्या बाहेर राहायचे असेल तर मी सांगतो तसे तुम्ही केले पाहिजे. प्रियांका गांधी या मोदींच्या विरुद्ध लढू शकत नाही. वाराणसी हा पूर्वीपासून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मतदारसंघ आहे. तरीही काँग्रेस येथे उभा राहण्यास घाबरते.
पाच वर्षे विष पिऊन पाहिले आहे. आता एकदा संधी देऊन बघा. आरएसएस आणि भाजपला हरवायचे असेल तर मुस्लिमांनी वंचित बहुजन आघाडीमागे ऊभे राहिले पाहिजे. त्यासाठी पवन पवार यांना तुम्ही मतदान करा, असे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले.