नाशिक - जिल्ह्यातील मालेगाव शहराची पावरलूममुळे संपूर्ण देशात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन पाळला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरातील मजूर वर्गाची रोजगाराअभावी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील पावरलूम काही अटी व शर्तींवर सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. अशी माहिती अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी बुधवारी दिली.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी निकम म्हणाले, कंटेनमेंट झोन वगळून सर्व उर्जा व हातमाग सुरू करण्याबाबत सुनिश्चित केले जाईल. वस्तुंच्या वाहतूकीत सामील असलेल्या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाईल. तसेच, आजाराबाबत लक्षणं असल्यास तसेच कंटेनमेंट झोन मधील कोणत्याही व्यक्तीस काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यंत्रमाग कामगारांनी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, शारीरिक अंतर पाळणे इ. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बंधनकारक राहील.
पावरलूम हे प्रतिबंधित क्षेत्रात आहे किंवा कसे, याच्या खात्रीसाठी पोलीस ठाणे निहाय एक पोलीस कर्मचारी, एक महानगरपालिकेचा कर्मचारी व पावरलूम संघटनेचा एक सदस्य असे पथक गठित करून ते अहवाल सादर करतील. त्याचबरोबर कंटेनमेंट एरिया डिकंटेनमेंट केल्यानंतर त्या ठिकाणचे पावरलूम देखील सुरू करता येणार आहे. याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडून वेळोवेळी स्वतंत्र आदेश पारित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पावरलूम सुरू करण्यासाठी उपस्थित मालक व चालकांनी त्यांच्या अडचणी मांडतांना विज वितरण कंपनीसह महानगरपालिकेमार्फत आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होण्याची विंनती केली. तसेच ज्या राष्ट्रीयकृत बँका सुरू आहेत, त्यांच्यामामार्फत रकमेचा भरणा, रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी डिजीटल पेमेंटसह आवश्यक त्या सुविधा सुरळीत करण्याबाबत विनंती केली. यावेळी, उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबत सर्व बँकांना यापूर्वीच आदेश पारित करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच, याबाबत काही अडचणी असल्यास थेट बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. या बैठकीला यावेळी इनर्जन्सी आपॅरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया, उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा, अपर पोलीस अधीक्षक संदिप घुगे, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, रत्नाकर नवले यांच्यासह पावरलूम मालक, चालक संघटनेचे प्रतिनीधी उपस्थित होते.