येवला (नाशिक) - निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव नाशिक जिल्ह्यातही पाहायला मिळाला. येवला तालुक्यातील अंदरसूल गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून २ ते ३ किलोमीटर अंतरावर जाऊन पडले. तसेच शेडची पडझड झाली. यामुळे कोंबड्या पाण्यात भिजल्या, काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
निसर्ग चक्रीवादळ आज दुपारच्या सुमारास अलिबागजवळील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर धडकले. याचा प्रभाव नाशिक जिल्ह्यातही पाहायला मिळाला. आज येवला तालुक्यात काही ठिकाणी वादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामध्ये अंदरसूल गावातील गजानन देशमुख या शेतकऱ्याच्या शेतातील पोल्ट्री फॉर्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये जवळपास चार ते साडेचार हजर कोंबड्या होत्या. मात्र, आजच्या पावसामुळे कोंबड्या पावसात भिजल्या. तसेच काही कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामध्ये जवळपास २२ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दरम्यान, काही ठिकाणी झाडांची पडझड झाली होती. त्यानंतर तलाठ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले.