येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप या गावात कुंभार पणत्या व बोळके बनवण्यात मग्न आहेत. प्रकाशाचा उत्सव अर्थात दीपावली सण अवघ्या थोड्या दिवसावर येऊन ठेपला आहे. दीपावली सणानिमित्त दिवे प्रज्वलित करण्यासाठी लागणार्या पणत्या आकार घेऊ लागल्या आहेत. या कामात कुंभारांचे संपूर्ण कुटुंब मग्न झाल्याचे चित्र येवला तालुक्यात पाहावयास मिळत आहे. मात्र कोरोनाचा फटका कुंभार कारागिरांना देखील बसला आहे. त्यामुळे इतरांच्या घरात प्रकाश करणारा कुंभार आज अडचणीत आहे.
कुंभारांची दिवाळी अंधारात -
कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे त्रिपुरी पौर्णिमा पर्यंत तुळशीजवळ व घरापुढे पणती लावण्याची परंपरा आहे. या पणत्या बनवण्याचे काम कुंभार करतात. दरम्यान, पणत्या बनवून सुकवण्यासाठी कारगीरांची लगबग सुरु आहे.
दरवर्षी दिवाळीची धामधूम असते. मात्र यावेळी कोरोना प्रादुर्भावामुळे कुंभार व्यावसायास फटका बसला आहे. या कुंभारांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र येवला तालुक्यात बघण्यास मिळत आहे.
कुंभार कारागिरांना कोरोनाचा फटका -
तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे महालक्ष्मीची मूर्ती बनवण्याचे कामसुद्धा सुरू आहे. या महालक्ष्मींच्या मूर्तीसाठी लागणारा रंग महागला आहे. कोरोनामुळे या रंगाची किंमत वीस ते पंचवीस रुपये महाग झाली. पणत्या व बोळके, महालक्ष्मी घेण्यास ठोक व्यापारी येत असतात. मात्र यावर्षी ठोक व्यापाऱ्यांनी ऑर्डर न दिल्याने कुंभार व्यावसायिक अडचणीत आहेत. दरवर्षी दहा हजाराच्या आसपास पणत्या बनवल्या जातात. मात्र, यावर्षी पाच ते सहा हजार पणत्या बनवल्याचे व्यावसायिक सांगतात. कोरोनाचा फटका कुंभार कारागिरांना देखील बसला आहे.
हेही वाचा- दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
हेही वाचा- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाची जनजागृती रॅली