नाशिक - कोरोनाचा संसर्ग पाहता येवला तालुक्यातील अंकाई किल्ला येथेही पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही नियम मोडून पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अंकाई किल्ल्यावर कोणीही पर्यटनास येऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वेध लागतात ते भटकंतीचे व निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याचे. त्यानुसार जिल्ह्यातील मनमाड - येवला रस्त्यावरील अंकाई - टंकाई किल्ल्यावर पर्यटकांनी सकाळच्या रम्य अशा निसर्गाचा आस्वाद घेत गर्दी केली होती. दाट धुक्यांनी वेढलेल्या या किल्ल्याचे मनोहारी रूप डोळ्यात साठवण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आले होते. यामध्ये तरुणाईसोबत आबालवृद्धांही समावेश होता.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात चोवीस तासात 204 कोरोनाबाधित; 7 जणांचा मृत्यू..
अंकाई किल्ल्यावरील पर्यटनास बंदी असतानाही मनमाड, येवला ,नांदगाव सह अनेक ठिकाणाहून पर्यटक येथे किल्ल्यावर पर्यटनास येत असतात. लॉकडाउन असल्याने किल्ल्यावर पर्यटनास बंदी असूनदेखील पर्यटकांची होणारी गर्दी बघता पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे यांनी या पर्यटकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून दंड वसूल केला. तसेच कोणीही पर्यटनास येऊ नये असे पोलिसांनी आवाहन केले.