नाशिक - जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आता रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे. त्र्यंबकेश्वरमधील पहिने, दुगारवाडी, हरिहर गड, इगतपुरीकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्याने पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर नाशिकमधील पर्यटनस्थळांवर पुन्हा गर्दी होत होती. या पर्यटकांवर दंडात्मक करवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिले आहेत. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव यामुळे नागरिकांनी या ठिकाणी पर्यटनाला येऊ नये, असे आवाहन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी केले आहे.
निसर्गाने बहरलेला त्र्यंबकेश्वर तालुक्यात 44 पर्यटकांवर कारवाई
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव हा कमी झाल्यामुळे अनेक नागरिक पर्यटन स्थळी धाव घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुका निसर्गाने बहरला असून इथे पर्यटनासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. जिल्ह्यातील पहिने, तसेच दुगारवाडी, आणि ब्रह्मगिरी पर्वत या ठिकाणी नाशिक, ठाणे, अहमदनगर, मुंबई व आजूबाजूच्या जिल्ह्यातून युवक-युवती हे येथे येत आहेत. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दुगारवाडी अशा 34 युवक-युवती व नागरीकांवर कारवाई केली आहे. तसेच ब्रह्मगिरी पर्वतावर पर्यटनासाठी आलेल्या सुमारे 10 नागरीकांवर कारवाई केल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांनी दिली आहे.
पोलिसांना चकवा देत शेतातून चालत पर्यटन स्थळी
कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पर्यटन स्थळी नागरिकांनी जाऊ नये, असे सातत्याने आवाहन करूनही वेगवेगळ्या भागातून पर्यटकांची रीघ सुरूच आहे. या पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पर्यटस्थळांवर जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी केली आहे. पोलिसांचा बंदोबस्त पाहून पर्यटकांनी पोलिसांना चकवा देत दुगारवाडीतील गावाच्या पाढिमागील भागातील शेतातून चालत प्रवेश केला. तसेच ब्रह्मगिरीच्या पाठीमागच्या भागाने हे नागरिक आल्याचे पुढे आले आहे. अशा पर्यटकांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच इथून पुढे अधिक सक्तीने कारवाई केली जाईल असेही सांगितले आहे.