नाशिक- घोटी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दोन मोबाईल दुकानातील लुटलेला मुद्देमाल आणि संशयित आरोपीकडून स्थानिक गुन्हे स्थानिक शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. महिनाभरात या गुन्ह्याची उकल करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
लॉकडाऊन दरम्यान घोटी शहर बंदचा चोरट्यांनी फायदा घेत अग्रवाल टॉवर येथील राधे मोबाईल शॉपी व धामणगाव रुग्णालयासमोरील ओम साई मोबाईल शॉपीमधून दुकानाचे शटर वाकवून विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट चोरी करुन पोबारा केला होता. याबाबत घोटी व वाडीवऱ्हे येथील गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारवाई करण्यात आला होता.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताचा माग घेत अमोल भाऊराव भगत (वय २१), योगेश काळू निर्गुडे (वय १९), विठ्ठल दामू ठोंबरे (वय २०), विश्वास प्रभाकर ठोंबरे,(वय २०), मावजी कोंडाजी मेंगाळ (वय २४) सर्व महादेव वाडी (ता. सिन्नर) येथून यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर पोलिसी खाक्या दाखवताच घोटी व धामणगाव येथील चोरीची कबुली दिली.
दरम्यान, चोरट्यांनी लपवून ठेवलेले तब्बल दोन लाख ६९ हजार चारशे रुपयांचे विविध कंपन्यांचे ६९ हँडसेट ताब्यात घेण्यात आले. सहायक उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, हवालदार शिवाजी जुंद्र, सचिन पिंगळ आदींच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणत मुद्देमाल ताब्यात घेऊन संशयितांना अटक केली आहे.