नाशिक - गंगापूर धरणाजवळ असलेल्या दोन खासगी फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्याठिकाणी हुक्का पार्टी करणाऱ्या 30 पेक्षा अधिक तरुण व तरुणींना पोलीस अधीक्षकांनी ताब्यात घेतले आहे. या हुक्का पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर झाल्याचाही पोलिसांना संशय आहे.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची धडक कारवाई -
नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये आता कोरोना बाधितांच्या आकडा वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. गर्दी न करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वच आस्थापना, हॉटेल, मॉल ,चित्रपटगृहांना देण्यात आले आहेत. तरीही अनेक नागरिक या आदेशाचे पालन करत नाहीत. हॉटेल आणि मॉल लवकर बंद होत असल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्या किंवा हुक्का पार्ट्या होऊ शकत नाही. याचाच फायदा घेऊन काही नागरिकांनी आपले फार्म हाऊस हुक्का पार्ट्यांसारख्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अशा ठिकाणांवर धडक कारवाया सुरू केल्या आहेत.
बंद दरवाजाआड सुरू होती हाय प्रोफाईल हुक्का पार्टी -
नाशिकच्या गंगापूर धरणाजवळील दोन खासगी फार्म हाऊसवर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. या ठिकाणी सुरू असलेल्या हुक्का पार्टीमध्ये दारू तसेच अमली पदार्थांचे सेवन झाल्याचे समोर आले आहे. बंद दरवाजाआड एक हायप्रोफाईल हुक्का पार्टी सुरू होती. पोलिसांनी छापा टाकून 30 पेक्षा अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असताना, अशा पार्ट्या कशा सुरू होतात आणि त्यांचे आश्रयदाते कोण आहेत? हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने आता समोर आला आहे.